Uncategorized

पुणे जिल्हा हादरला! “मुलीला घेऊन जा, नाहीतर.”; जावयाच्या फोननंतर २३ वर्षीय गर्भवती आयटी इंजिनिअरची आत्महत्या

संजिवनी न्युज

पुणे जिल्हा हादरला!
“मुलीला घेऊन जा, नाहीतर.”; जावयाच्या फोननंतर २३ वर्षीय गर्भवती आयटी इंजिनिअरची आत्महत्या

पुणे

उंड्री परिसरात हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करीत पतीसह सासू-सासऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपातून २३ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास लावून आत्महत्या केली.

वैष्णवी प्रवीण जरांडे (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून काळेपडळ पोलिसांनी पती ओंकार संजय घिसरे (रा. वडाचीवाडी, उंड्री) याच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवीचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकारसोबत झाला होता. लग्नावेळी तिच्या कुटुंबीयांनी १० तोळे सोने दिले होते, तसेच लग्नाचा संपूर्ण खर्चही केला होता. पतीच्या मागणीनुसार एक कंपनीची दुचाकीही दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. विवाहानंतर वैष्णवी सुमारे २३ दिवस सासरी राहिली. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने ती बंगळुरू येथे गेली होती. जूनच्या अखेरीस तिने पुन्हा सासरी घरातूनच आयटी कंपनीचे काम सुरू केले.

याच काळात तिचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तक्रारीनुसार, १० जून रोजी ओंकारने वैष्णवीच्या आईला फोन करून लग्नासाठी ४० ते ४५ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. त्यानंतर वैष्णवीने माहेरून पाच लाख रुपये आणावेत किंवा कार घेऊन द्यावी, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. वैष्णवी गर्भवती होती. त्यानंतरही पती आणि सासू-सासऱ्यांकडून तिचा त्रास सुरू असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
१९ सप्टेंबरपासून ती हिंजवडी येथील एका प्रकल्पावर कामासाठी जाऊ लागली होती. त्यामुळे घरातील कामावरूनही तिला त्रास दिला जात असल्याचे तिने माहेरच्या मंडळींना सांगितले होते.

दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने सासूला फोन करून आपण खूप त्रस्त असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास ओंकारने वैष्णवीच्या आईला फोन करून मुलीला घरी घेऊन जा,अन्यथा तिच्याकडून काहीतरी चुकीचे होऊ शकते, असे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी वैष्णवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

२५ सप्टेंबर रोजी सकाळी तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर आई आणि भाऊ उंड्री येथील घरी पोहोचले. त्यावेळी वैष्णवी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

Related Articles

Back to top button