पुरंदर हादरला! जुन्या वादाचा राग मनात धरून “या” गावातील तरुणाने वृद्ध दांपत्याची केली हत्या
संजीवनी न्यूज

पुरंदर हादरला!
जुन्या वादाचा राग मनात धरून “या” गावातील तरुणाने वृद्ध दांपत्याची केली हत्या
पुणे
पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाने वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३), अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश सुभाष धिवार (वय २७, रा. पानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.२० वाजण्यापूर्वी पानवडी गावच्या हद्दीत घडली. फिर्यादी अश्विनी अमर खरात (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. पानवडी) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी गणेश धिवार याचा काही दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या दारासमोरून गायी व बैल नेत असताना वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या आई रत्नमाला धिवार आणि वडील मोहन धिवार यांच्यावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेमुळे पानवडी परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याच्या आरोपामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२९ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे पुढील तपास करीत आहेत


