पुणे ग्रामीण दलात शोककळा.. बेफाम अन् बेशिस्त वाहतुकीने घेतला सहाय्यक फौजदाराचा बळी ‘ससून’मधील कर्तव्य उरकून परतताना काळाचा घाला
संजिवनी न्युज

पुणे ग्रामीण दलात शोककळा!
बेफाम अन् बेशिस्त वाहतुकीने घेतला सहाय्यक फौजदाराचा बळी ‘ससून’ मधील कर्तव्य उरकून परतताना काळाचा घाला
पुणे
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसरात दिवसेंदिवस फोफावलेल्या आणि निष्काळजी बेफाम वाहतुकीने अखेर एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचाच बळी घेतला आहे. ‘ससून’ रुग्णालयात मयताचा बंदोबस्त पूर्ण करून उरुळी कांचनला परतल्यानंतर जेवणासाठी रस्ता ओलांडणाऱ्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश रतन दाभाडे (वय -49, मूळ रा.मेथी, ता. शिंदखेडा, जि. धुळे; सध्या रा. सासवड, ता. पुरंदर) यांचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.
शुक्रवारी (ता. 18) मध्यरात्रीच्या सुमारास उरुळी कांचन हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर महामार्गावर हा अपघात झाला. याबाबत पोलिस शिपाई आशिष संजय उल्हाळकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील पांढरस्थळ परिसरात शुक्रवारी सकाळी पाण्यात वाहत आलेल्या एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पोलिस शिपाई आशिष उल्हाळकरबरोबर पुण्यातील ससून रुग्णालयात गेले होते. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने तोरुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला. त्यानंतर दोघे रात्री उशिरा सरकारी दुचाकीवरून उरुळी कांचनकडे परतले.
उरुळी कांचनजवळ आल्यानंतर दाभाडे यांनी जेवण केले नसल्याचे सांगितले. व ते पुणे-सोलापूर महामार्गावर श्रीकृष्ण मंगल कार्यालयाजवळ उतरले. त्यानंतर रस्ता ओलांडून ते जेवणासाठी एकटेच निघाले होते. यावेळी श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना पुणे-सोलापूर महामार्गावर दाभाडे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दाभाडे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उरुळीकांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील मेथी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


