Mumbai

भयानक!!!! स्कॉर्पिओची ट्रकला पाठीमागून धडक; चार युवक जागीच ठार, तिघे गंभीर

संजीवनी न्यूज

भयानक!!!! स्कॉर्पिओची ट्रकला पाठीमागून धडक; चार युवक जागीच ठार, तिघे गंभीर

पुणे

कराडजवळ पुणे-बंगळूरु महामार्गावर नव्या सहापदरी उड्डाणपुलावर झालेल्या स्कॉर्पिओ आणि ट्रकच्या भीषण अपघातात चार युवक जागीच ठार झाले. तर, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन कातर खटाव (ता.हरिद्वार कुंभ खटाव, जि. सातारा) येथील सात तरुण स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे परतत होते.

मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ नव्याने सुरू झालेल्या सहापदरी उड्डाणपुलावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. वेगावर ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी पाठीमागून ट्रकला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत तेजस देशमुख (वय २५, चालक), सागर निंबाळकर (वय२३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१, सर्व रा.कातर, ता. खटाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे (वय २१), शांतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, दस्तगीर आगा, राहुल कदम, सचिन देवकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

नव्याने सुरू झालेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या आणि एकाच खांबावर (सिंगल पिलर) उभ्या राहिलेल्या भव्य सहापदरीउड्डाणपुलावरील हा पहिलाच भीषण अपघात ठरला आहे.

बहुप्रतिक्षेनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला होता. रात्रीच्या वेळी उड्डाणपुलावर वाहनांचा अधिक वेग आणि चालकाचा अंदाज चुकल्यामुळे ही प्राणघातक दुर्घटना घडली आहे. या एकाच गावातील चार तरुणांच्या अकाली मृत्यूने कातर खटाव गावासह सातारा जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button