Mumbaiकांदिवली

सत्तर हजारांवर भाविक भुलेश्वर चरणी लीन

कावड मिरवणूक व पालखी मिरवणूक

वाघापूर, दि. १७ (वार्ताहर) — पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी तब्बल सत्तर हजारांवर भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. महादेवाच्या जयघोषात आणि धार्मिक वातावरणात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

पहाटे तीन वाजता मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवलिंगावर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. श्रीक्षेत्र भुलेश्वराची नित्यनैमित्तिक पूजा करण्यात आली.

पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी महाआरती केली. यावेळी पंचायत समिती सदस्य माऊली यादव, माजी सरपंच अरुण यादव आणि माळशिरसच्या सरपंच आरती यादव उपस्थित होते.

पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी भुलेश्वर यात्रेची पाहणी केली. माळशिरस येथील काळे वाड्यातून माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत भुलेश्वरच्या पालखीचे श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिराकडे प्रस्थान झाले.

मंदिराजवळील वन विभागाच्या विश्रामगृहात विसावा देण्यात आला. त्यानंतर भुलेश्वर देवास अभिषेक घालण्यात आला. महाआरतीनंतर कावड मिरवणूक व पालखी मिरवणूक काढण्यात आली.

दुपारी तीन वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारावर कावडींची धार घालण्यात आली. मंदिराच्या समोर महाआरती करण्यात आली. देवाचा छबिना वाजत-गाजत मुख्य शिवलिंगाजवळ आला. प्रमुख मानकरी व माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहने अडविल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. सकाळपासूनच मंदिराभोवती भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

भाविकांना रांगेत दर्शन देण्यासाठी जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिवसभर आरोग्य सेवा देण्यात आली.

माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने दिवसभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच भुलेश्वर अन्नदान मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

छायाचित्र कॅप्शन

माळशिरस : श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे कावड व पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक.

स्रोत: वार्ताहर, संजीवनी न्यूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button