
वाघापूर, दि. २५ (वार्ताहर) — महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने ग्रामीण व शहरी भागातील वयोवृद्ध निरक्षर विद्यार्थी आणि नागरिकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे मत शिक्षण संचालनालय (योजना) संचालक कृष्णकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
श्री भुलेश्वर मंदिर परिसरात एमजीआरपीपी नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शिक्षण संचालनालय (योजना) विभागाचे सहसंचालक शशिकांत म्हेत्रे, सहसंचालक सतीश चौधरी आणि सहाय्यक संचालक रोहित यादव उपस्थित होते.
याप्रसंगी श्री भुलेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळशिरस, नवनाथ इंग्लिश मीडियम शाळा या शाळांच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून पथनाट्य व जनजागृतीपर गीते सादर केली.
यावेळी कृष्णकुमार पाटील यांनी सर्वांनी साक्षरतेची शपथ घेतली. योजना विभागामार्फत याबाबतच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
बालवयातील जाणाऱ्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षा, चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचविणे आणि निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाच्या विविध योजना व अभियानांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
यावेळी पुरंदर तालुका पंचायत समितीचे सदस्य, माजी सरपंच माळशिरस, गटविकास अधिकारी अनिल देशपांडे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख उमेश नेवसे, तसेच भुलेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
निरक्षर नागरिकांना शिक्षणाची संधी मिळावी आणि ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण वाढावे यासाठी अशा जनजागृती उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
छायाचित्र कॅप्शन:
भुलेश्वर : नवभारत साक्षरता अभियानाच्या जनजागृती कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व मान्यवर.
स्रोत: वार्ताहर, संजीवनी न्यूज



