Mumbaiकांदिवलीनवी मुंबई

आंबळे गावाची कावड ठरली भुलेश्वराच्या यात्रेत लक्षवेधी

चांदीने मढविलेली उंच व वजनदार कावड ठरली आकर्षणाचे केंद्र

वाघापूर, दि. ०९ (वार्ताहर) — पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील ऐतिहासिक आंबळे गावातील अनेक वर्षांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा असलेली कावड यंदाही श्रीक्षेत्र भुलेश्वराच्या यात्रेत विशेष लक्षवेधी ठरली. उंच, वजनदार आणि चांदीने मढविलेली ही कावड भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ही कावड श्री ढवळेश्वराच्या चरणी नेऊन पवित्र जल अर्पण केले जाते. त्यानंतर छबिना काढण्यात येतो. चौथ्या सोमवारी माळशिरस येथील श्री भुलेश्वर मंदिरात जल अर्पण करण्याची परंपरा आहे.

आंबळे ग्रामस्थ आजही ही धार्मिक परंपरा मोठ्या श्रद्धेने जपत आहेत. या माध्यमातून गावचा समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होत आहे.

‘हर हर महादेव’च्या जयघोषात कावड यात्रा

हर हर महादेव’च्या जयघोषात आणि गुलालाची उधळण करत आंबळे गावातील ग्रामस्थ व तरुणांनी भुलेश्वर डोंगराच्या मार्गाने कावड यात्रा पार पाडली.

भक्तिमय वातावरणात कावड श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिरात आणण्यात आली. मंदिराच्या प्रवेशद्वाराला कावड पाच वेळा टेकवून श्री भुलेश्वरास पवित्र जल अर्पण करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थ आणि तरुणांचा उत्साह पाहायला मिळाला. धार्मिक श्रद्धेसोबतच गावची पारंपरिक संस्कृती आणि एकजूट या कावड यात्रेतून अधोरेखित झाली.

कावडीवर दोन किलो चांदीचे आवरण

आंबळे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने कावडीवर तब्बल २ किलो चांदीचे आवरण चढविण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची कावड अधिक आकर्षक आणि उठावदार दिसत होती.

कावडीचे भव्य स्वरूप, चांदीचे आवरण आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली मिरवणूक यामुळे श्रीक्षेत्र भुलेश्वराच्या यात्रेत आंबळे गावची कावड विशेष चर्चेचा विषय ठरली.

📸 फोटो कॅप्शन

भुलेश्वर : आंबळे गावातील चांदीने मढविलेली कावड यात्रेत लक्षवेधी ठरली.

स्रोत : वार्ताहर, संजीवनी न्यूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button